Sunday, October 9, 2011

आहे माझ्या मराठीत असा गोडवा ओवीचा

आहे माझ्या मराठीत
असा गोडवा ओवीचा
असे सजले अंगण
धुंद सुवास फुलांचा

आहे माझ्या मराठीत
सारी गाथा अभंगाची
व्यथा विसरती सारे
साथ मिळे मृदंगाची

आहे माझ्या मराठीत
मजा भारी लावणीची
शब्द शब्द लयदार
चाल भारी ही ढंगाची

आहे माझ्या मराठीत
बोल रांगडा मातीचा
जसे उजळे आकाश
स्फोट होताच विजांचा

आहे माझ्या मराठीत
शारदेचं वरदान
साहित्याच्या वर्षावाने
जणू फुलले अंगण

आहे माझ्या मराठीत
समूह हा कवितेचा
डंका विश्वात अवघ्या
वाजे आज मराठीचा

No comments:

Post a Comment