Wednesday, October 19, 2011

शब्द गालावरल्या खळ्या खुलणाऱ्या

शब्द नित ऋतू बदलाचा
शब्द कधी 'ठग' असतात
काळ्या,निळ्या शाईने भरलेले
पांढऱ्या आकाशातील 'ढग' असतात

शब्द गोठता गारवा कधी
शब्द कधी पेटती 'धग' असतात
पांघरून घेतलेल्या मनावर
पाळत ठेवणारे 'खग' असतात

शब्द कधी कळ्या उमलणाऱ्या
शब्द गालावरल्या खळ्या खुलणाऱ्या
शब्द कधी भर भरून देणाऱ्या
शब्द कधी होती झोळ्या मागणाऱ्या

शब्द कधी डोंगरातला, दरीतला
शब्द कधी त्या उपाशी शिदोरीतला
शब्द कधी आजचा,आताचा
शब्द कधी स्वप्नातल्या परीतला

शब्द कधी मोकळा,बांधलेला
शब्द ठिपका रेषेत मांडलेला
शब्द कधी एक धडपड मनाची
शब्द कधी ताठ उभा राहलेला

शब्द कधी शेवटीही एक सुरवात असतात
शब्द विजयाच्या धुंदीत दिलेली मात असतात
शब्द कधी कधी तुझ्या माझ्यात असतात
शब्द कधी मन मोकळे कधी मौनात असतात

No comments:

Post a Comment