Sunday, October 23, 2011

सूर्य असतो प्रखर दिवसा अन रात्री भोळा चंद्र

तू म्हणतोस सृष्टीचं
सख्या चक्र असंच चालतं
विचार करून सांग मग
हे असं कसं रे होतं ?

कोसळत असतो पाऊस अन
पसरत असतं ऊन
इंद्रधनू सांग मग
त्यातून कसं फुलतं?

खाली असते जमीन अन
वर असतं आभाळ
तरी त्याचं क्षितिजावर
मिलन कसं रे होतं?

शब्द असतात डोक्यात अन
मनात असतात भावना
तरी त्याचं एकत्र येऊन
गीत कसं रे बनतं?

काळजात असते माया
अन र्हदयात असते प्रेम
सांग त्यांनी मिळून मग
नातं कसं रे जुळतं ?

हातात असतं नशीब आणि
डोळ्यात असतात स्वप्नं
तरी त्यांना घेऊन आपलं
जीवन कसं रे फुलतं?

सूर्य असतो प्रखर दिवसा
अन रात्री भोळा चंद्र
चांदणं बघून रात्रीच मग
आभाळ का रे सजतं ?

No comments:

Post a Comment