रात्री राजस चंद्र नव्या नवतीसारखा
विलक्षण सुकुमार तेजात झळकला,
लाजेची लाली त्याच्या मुखड्यावरची
ठेवणीतला त्याचा इशारा ओळखला..!!
भुलवतो चंद्र शुक्ल-कृष्णाच्या कलेकलेने
नेहमीचाचं त्याचा हा संमोहनाचा डाव,
मनही मग उचंबळून त्याला भिडलं
धडधडणाऱ्या काळजाचा घेतला ठाव..!!
शेजारची अवखळ चांदणी खुदकन हसली
म्हणे माझ्या चंद्रावर हा देखील भाळला,
उत्तरलो मी तुझ्या मंगलमय प्रियकराने
कोजागिरीत पापाचा अंधार बघ जाळला..!!
तारकांच्या गुजगोष्टींनी कमाल तेव्हा केली
प्रकाशाच्या सोहळ्यात सखीची याद आली,
एकलेपणाची हुरहूर क्षणात मनी ह्या दाटली
रम्यतेची भावना तेव्हा आपसूक बाद झाली..!!
युगानुयुगे जगाच्या प्रेमाचा जो उद्घाता
खट्टू झालेलं माझं मन त्याने जाणलं,
प्रितीचं तेज माझ्या ओंजळीत ओतून
मी प्यायलेल्या चैतन्याने सुख भिनलं..!!
मनी जोपासलेल्या प्रीतीच्या चंद्राचा
अधिकचं खुलला रंग छान गव्हाळी,
चंद्राच्या इष्काचा अमृतप्याला रिचवून
माझ्या चंद्रकोरीला लाभली नव्हाळी..!!
No comments:
Post a Comment