फीतूर (गझल )....
लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!!
श्वास ओले पैंजणाचे
बासरीचे सूर होते ..............!!
कंकणी जे स्पंदनी ते
मी मला काहूर होते .............!!
भाळता आभाळ भाळी
चंचला मी चूर होते ..............!!
वाळले डोळ्यात अश्रू
काजळा आतूर होते ..............!!
गाजले ओठात नाही
हारणे मंजूर होते ................!!
अंतरी तुझ्या जळोनी
मी नवा अंकूर होते ..............!!
-----------------------------------------------------------------
बंधन (गझल)
मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
झाला लिलाव माझा त्या बंधनात आहे
श्वासात वादळाच्या ऐसा जगून आलो
अद्याप शाप त्याचा जो स्पंदनात आहे
पाहून चंद्र आला प्रतिबिंब आठवांचे
तो मालकंस आता का पंचमात आहे
भेटीत मौन तैसे ताजेतवान होते
मी हाय आजही का तव आंदणात आहे
दे तू मलाच झोके प्रेमातले जरासे
वारा पसार व्हावा जो अंतरात आहे
गंधात केवड्याच्या वेणी सुकून गेली
स्पर्शात ती गुलाबी अन चांदरात आहे....
वृत्त (गझल )
मी तुला आता स्मराया लागले
वा स्मशानी वावराया लागले ?
पापणीला भार झाली आसवे
प्राण ओले अन तराया लागले
बंद ओठी राहिले हृदयातले
कोण कोणा सावराया लागले ?
ओळखीच्या फक्त झाल्या त्या चुका
ते म्हणाले मी हराया लागले
पाठ केले मी तुला कित्येकदा
वृत्त माझे काचराया लागले
प्रीत आणिक न्याय दोन्ही आंधळे
पांगळ्याला ते धराया लागले ?
वेदनेचा चेहरा मज बोलला
"मी कुरुपाला वराया लागले"
थेंब शाईचा अताशा ओकते
मी (कविता) विषाने बावराया लागले.....
sanjana
No comments:
Post a Comment