Monday, November 7, 2011

तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

खोवशील ना मला माझ्याही नकळत

तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त

तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद

तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन

तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना

तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी

तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने

तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर

तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

परडीत वेचशील ना मला न तुडवता

तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हायचंय मला

बाळगशील ना मला नेहमी बरोबर

तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हायचंय मला

पहाशील ना माझ्याकडे साश्रू नयनांनी

तुझ्या पाणिदार डोळ्यातलं काजळ व्हायचंय मला

झुलशील ना माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर

तुझ्या कानातलं झुबकेदार डूल व्हायचंय मला

न्याहाळशील ना मला रात्रभर एकटक

तुझ्या शयनगृहातील आरसा व्हायचंय मला

नाचशील ना माझ्या सप्तसुरी तालावर

तुझ्या पायातलं रुणझुणतं पैजण व्हायचंय मला

धरशील ना मला ह्रदयाशी कौतूकानं

तुझ्या पायात घोटाळणारं इवलसं पिलू व्हायचंय मला

पहाशील ना मला सारखं मागे वळून

तुझ्या पाठीवरला न दिसणारा तिळ व्हायचंय मला



.
thanks तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ ुल व्हायचंय मला

प्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे

पाहणे.

No comments:

Post a Comment