Monday, August 8, 2011

श्रावणाचा तो महीना होता

श्रावणाचा तो महीना होता
आपल्या शेवटच्या भेटीचा
पाउस असा कोसळत होता
जणु काही होता वळवाचा

आभाळ मनात दाटलेलं होतं
येथुन पुढच्या विरहाच्या दु:खाने
हिरवीगार झालेली धरा सुद्धा
खिन्न खिन्न वाटत होती मनाने

बरसणार्‍या एकेक सरींसोबत
एकेक आठवण न्हाऊन निघत होती
आठवणींची बरसात मनाला
चिंब चिंब भिजवत होती

पाउस डोळ्यातुनही बरसत होता
दाटलेलं आभाळ मोकळं करत होता
मनातल्या भावनांचा बांध नकळत
कधीचाच फुटलेला होता

बरसणार्‍या पावसात
डोळ्यातला अश्रु लपत होता
ओठ अबोल असले तरी
नजरा खुप काही सांगत होत्या

येणार्‍या हुंदक्यानां आवरताना
मन आपण निष्ठुर केलं होतं
हातातला हात सुटतानाचा
एकमेकांना दुर लोटलं होतं

डोळ्यात आसवे घेवुन
तु पाठमोरा वळला होता
तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत
दिस माझा क्षितीजापार कलला होता

थंडगार सुटलेला वारा सुद्धा
तुझा स्पर्श देउन जात होता
मनात मात्र विचार नी भावनांचा
पाठशिवणीचा खेळ सुरु झाला होता

श्रावणातला पाउस आता
कधीच मला भिजवत नाही
श्रुंगारलेली असली धरणी जरी
मन माझे आता फुलतच नाही

No comments:

Post a Comment