Thursday, January 17, 2013

मात्र माझी जीवनसखी बनून गेली

"मला पाहताच तिने माझी गळाभेट घेतली.. स्पर्शामध्ये मात्र स्वार्थाची अनुभूती होती.. चीड जरी आली तरी मनुष्य मी.. आधी हलकेच दूर सारायचो .. मग मात्र मिठीत घ्यायचो... क्षणिक सुख मिळवून काय साधतो आपण.. पण हल्ली तर क्षणभर सुखही महाग झालयं.. तिच्या हातामध्ये पर्याय नव्हता... माझ्या मनाला मात्र संयम साधता येत नव्हता..." "हे काय लिहिणं चाललयं, विनू..." "असचं.. पूर्वीचे दिवस... नवखे कलाकार.. कधी त्यांचा माज तर कधी त्यांची अगतिकता... कधी जवळीक कधी दुरावा..." "कुठल्या नटीची आठवण आली?" "तू समोर असताना अजून कोणास कशाला आठवू..." "उगाच साधेपणाचा आव आणू नकोस.. कितीतरी संधी मिळाल्या असतील तुला..." -- तिच्या बोलण्याचा उद्देश जाणवला मला... आमची इंडस्ट्री तशीच होती साधारणतः सामान्य माणसे नाव ठेवण्यास लगेच तयार... एकदा पैसा, फेम आला कि हीच माणसं आपली स्तुती सुरु करतात... त्यात हि मला भेटली.. मित्र म्हणाले- "नटीसोबत रिलेशन्स नकोच ठेवुस.. निघून गेली कि तुझा देवदास व्हायचा..." बरोबर होते त्यांचे.. चार दिन का तमाशा... आणि मी असे बरेच लोक जवळ येताना आणि दूर जाताना अनुभवले होतेच... ..काय कोणास ठावूक.. हि मात्र माझी जीवनसखी बनून गेली... तिच्या आणि माझ्यामध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल दोन नाती होती.. किंबहुना त्या रेषा आम्हीच आखून घेतल्या त्यामुळे कधी कलह निर्माण नाही झाला... "आज मलाही माझे पूर्वीचे दिवस आठवले...शेखर माहितेय तुझ्यामुळे ओळख झालेला.. माझ्या मागेच लागला होता... मी मात्र साफ नकार दिला... तुला म्हणलेले मी त्यावेळी..." "लेखा, मला माहित्येय ते.. आणि तू त्याला जवळ येऊ दिले नाहीस यामागचे कारण नाही विचारले मी कधीच... तो एक स्ट्रगलर होता त्यावेळी... " ती काही काळ गप्प होती.. थोडेसे रागावली होती माझ्यावर.. आत निघून गेली.. मी बाहेर कठड्याला टेकून उभा राहिलो.. सिगारेट शेलकावली.. बाहेर धुकं जमलं होतं. थंडीचे दिवस होते.. काहीवेळा काही गोष्टी आपल्या जीवनात त्या धुक्यामागे गायब झालेल्याच बरे असते.. त्यांची जाणीव नसते आपल्याला.. कारण जर धुकं दूर झाले आणि त्या गोष्टी समोर आल्या कि त्या पचवायला जड जातात.. आकाशात जमलेले ढग काहीवेळा हवेहवेसे वाटतात, कारण उन्हाची झळ बसलेली कोणाला आवडते! आज सामान्य जनतेला आमच्या जीवनाचं अप्रूप असतं.. तसंच आम्हाला त्यांच्या.. फक्त ते आम्ही दडवून ठेवतो आमच्या मनात... जशा काही गोष्टी धुक्यामागे दडवलेल्या....

No comments:

Post a Comment