Thursday, January 17, 2013

"आईशप्पथ सांगतो, या बसच्या ना..

माझा दिल... (भाग १) "आईशप्पथ सांगतो, या बसच्या ना....इतका वेळ झक मारायची, वाट पहायची आणि सीट मिळायची लांबच. साधी घुसायला जागा नाही आत. माणसाला दोन पाय असतात रे...एका पायावर पण उभे राहता येते हे मान्य आहे मला.पण, त्याला हि लिमिट असते रे.आणि या कंडक्टरच्या मायला. सकाळी सकाळी सुट्टे पैसे काय झाडावरून तोडून आणू का? मिनू आईशप्पथ, आता तू तरी दगा नको देउस हा...इतक्या गर्दीतून आपण भेंडी तुझ्यासाठी आलोय.तू हि असशील या बसमध्ये. आपल्याला खात्री आहे.दिसली एकदाची.अरे ये जाड्या बाजूला हो कि,बघू देणा मला माझ्या मिनुला. अरे ओ मेरी जानेमन मिनू.... बता कैसे में तुझे इस दुनिया से छिनु? आजकल तेरे हि नाम के तारे में गिनु. वाह वाह...माशह अल्लाह....प्रेमात माणसं कविता बिविता करतात.पटलं बाबा आपल्याला.ये मिनू बघ कि मागे.बघ तुझा श्री उभा आहे मागे. वाह, काय तिचे डोळे, ते वाऱ्यावर अलगद उडणारे केस.गेले कित्येक दिवस मिनुचा पाठलाग करतोय.पाठलाग नाही.मी काही टपोरी नाही पाठलाग करायला.मी फक्त तिची सावली बनून फिरतो.पहिल्या क्षणी बघितल्या बघितल्या कुणी प्रेमात पडते कि नाही ते आपल्याला माहित नाही. पण बघितल्या बघितल्या कुणाचं तरी रूप आपल्याला वेड लावू शकतं हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगू शकतो. गरीब असो वा श्रीमंत, माणूस आयुष्यात एकदा ना एकदा प्रेमात पडतोच.काहीजण मान्य करतात.काही लपवून ठेवतात.लपवून काय मिळवतात माहित नाही.पण माणूस आयुष्यात एकदातरी प्रेमात पडतोच, हेच आपलं मत आहे.साला जल्लाद पण कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडत असणार.मी पडलो होतो...प्रेमात...माझ्या मिनुच्या.पण हि साली, मागे बघेल तर वळून? जा गेलीस उडत. नाही बघत तर नाही बघत.मोठी ऐश्वर्या समजते का स्वत:ला? पण.... हि ऐश्वर्या असती तर आपण हिच्या मागे असे फिरलो असतो का?. अरे बोलायच्या नादात मिनुचा STOP आला सुद्धा? आयला या ड्रायवरच्या.कसली घाई लागलीय याला? "अति घाई संकटात नेई".... नाही नाही..."अति घाई श्रीला मिनूपासून दूर नेई" उतरली.तिचा Stop , तोच आपला.आपल्याला कसला आलाय Stop ? आपण वाऱ्यासारखे...स्वत:च्या मनाचे राजे.पण आम्हाला राज्य नाही. दिशा आमच्या मालकीच्या,पण दिशा दाखवणारे कुणी नाही. मग सगळ्याच दिशा आपल्या. पर्याय खूप म्हणजे नियतीचा निराळा खेळ.पर्याय खूप झाले कि वाट अडते.निर्णय जागेवरच हट्ट करून बसतात.पुढे काही सरकत नाहीत. देऊन परत कसा घ्यायचं हे नियतीला बरोबर कळते. शिक्षकांच्या अथक प्रयत्न आणि त्याच्या प्रचंड तडजोडीमुळे इंजीनिअर झालेला मी एक साधासुधा मुलगा. नावात 'श्री' असले तरी पवित्र असे माझ्यात काहीच नव्हते... फक्त एक सोडले तर.... ते हो..... I am v..g..n सरळ सोप्या शुद्ध मराठीत सांगायचे तर.. मला अजून ते करायचा चान्स मिळाला नव्हता आणि यात मा कें संस्कार वगैरे काही नव्हते हा... it is just a lack of opportunity....आणि आमचा थोडासा फट्टूness. असो... मिनुची आणि माझी तशी काही ओळख नाही.पण नजरानजर खुपदा झालीय हे मात्र नक्की.ती मला चेहऱ्याने ओळखत असेल.असेल काय? ओळखतेच.मी सेटिंगच तशी केली होती.आपल्याला एकच माहित होते,"जो दिखता हे,वो हि बिकता हे". तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे मी नेहमी काहीना काही करायचो.पण त्यात हि एक रुबाब असायचा हा. पोरींकडे जास्त लक्ष दिलं कि,त्या भाव देत नाहीत असे मला माझा परमपूज्य मित्र अंड्या बोलला होता.अंड्या म्हणजे आजवर २२ प्रेमप्रकरणे यशस्वीपणे पूर्ण केलेला एकमेव मर्द.तो गुरु होता आमचा. त्यादिवशी असाच मित्रांसोबत फिरत होतो.रविवार होता.काय माझं नशीब आणि मिनू दिसली. आयला पण मी हाफ चड्डीवर.तिने मला असे पाहिले तर?? इज्जत का फालुदा.इज्जत काय फक्त तुम्हा मुलींनाच असते? आम्हा मुलांनापण असते. मी प्रसादच्यामागे लपून लपून चालू लागलो.मिनूने केस धुतलेले होते.वाह...काय ती सकाळ.आमच्या ग्रुपमधल्या प्रसादची बहिण विद्या म्हणजे मिनुची खास मैत्रीण.मिनू काहीतरी घ्यायला किराणाच्या दुकानावर आली होती.आम्ही टपरीवरूनच तिला पहात होतो.आम्ही म्हणजे फक्त मी.माझे लक्ष फक्त तिच्याकडे होते.किराणा वाल्याने साबण देताना तिला स्पर्श केला.मी म्हणालो, "काय रे साल्या टकल्या, चान्स मारतो का? येऊ का तिकडे? माझी आहे मिनू."पण माझे बोलणे त्याला ऐकू नाही गेले.मी मनातच बोलत होतो न त्यामुळे. साबण घेऊन ती निघाली.पण निघून ती आमच्याकडेच येत होती.स्वप्न आहे कि काय हे? मिनुचे विद्याकडे काहीतरी काम होते.म्हणून ती प्रसादकडे आली. मिनुची नि माझी नजरानजर झाली.मी माझी हाफचड्डी लपवली. पण लपवलेली गोष्ट कधी लपते का? ती येतेच...जगासमोर...कधी ना कधी. ती खुदकन गालात हसली.पण मलाच लाजल्यासारखे झाले. हे भगवान, क्यू?क्यू?क्यू?...क्यू में आज हाफचड्डी पेहनके आया? ती प्रसादला म्हणाली,"विद्याला सांग कि,मी आज संध्याकाळी बस stopवर वाट पाहीन.५ वाजता.क्लासला एकत्र जाणार आहोत आम्ही." ती निघून गेली.जाता जाता माझ्याकडे कान्या नजरेने बघून हसून गेली. कधी कुणाकडे आणि कसं बघावं हे ह्या पोरींना बरोबर कळतं. ती निघून गेली.एकदम सगळं भकास झाल्यासारखं वाटू लागलं. बाकीचे पुन्हा गप्पांत मग्न झाले.पण मी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पहात होतो. संज्याने चहा आणि चकली माझ्या हातात दिली.मी मनात म्हणत होतो, "ये टपरी....ये चकली... मेरे काम कि नही...मेरे काम कि नही" आईशप्पथ तिने एकदम पटकन मागे वळून पाहिले.नजरानजर झाली.काय सुंदर लाजली ती!! खल्लास झालो मी. लगेच माझे logic जागे झाले.म्हटले आज तर रविवार.आज कसला आलाय क्लास?याचा अर्थ???तो इशारा मला होता.... वाह!!.... हे भगवान तेरे घर में देर हे...अंधेर नही. मला हात पसरून आकाशात उडावेसे वाटत होते.पंख फुटल्यासारखं वाटत होते.माझे पंख म्हणजे मिनू.माझी मिनू. तसाच घरी पळालो..कपडे इस्त्रीवाल्याकडे देऊन आलो.दुपारी झोप लागणारच नव्हती. हि वेळ म्हणजे जगातली सर्वात दृष्ट गोष्ट असते.ती नेहमी स्वतःचा वेग आपल्या मनाविरुद्ध ठेवते.आपल्याला वाटेल कि, वेळ लवकर जावी तेव्हाच ती हळूहळू चालते.नाही तेव्हा भरभर धावते. १ वाजला, २ वाजले ,३ वाजले, साडे तीन वाजले...पण ५ काही वाजत नव्हते.... शेवटी साडे ३ वाजताच मी घर सोडले आणि बस stop वर जाऊन उभा राहिलो. (क्रमश:) माझा दिल... (भाग २) चालता चालता कधीकधी चुकून मिनुचा हात हाताला लागायचा.अहाहा...काय तो शहारा! शब्द अबोल झाले कि, स्पर्श खूप बोलू लागतात.इथे स्पर्शामागोमाग ती हि बोलायची,"सॉरी हं". मी मनातच म्हणायचो,"सॉरी त्रास दिला कि बोलतात.मला तुझ्या स्पर्शाने काहीच त्रास नाही होतंय." म्हणता म्हणता पण काहीच न म्हणता चौपाटी जवळ आली.रविवारमुळे गर्दी असायला हवी होती.पण दुपार असल्याने वाचलो. किनाऱ्यावर जाऊन मी तसाच वाळूत बसलो.ती उभीच राहिली.मला वाटले कि ती म्हणेल,"इइइइइ.....इथे बसायचं?".पण ती थोडं अंतर ठेऊन बसली. त्याच वाळूत...माझ्यासोबत.मनातच म्हटलं कि, हि पोरगी आपल्या हद्दीत बसते.चालेल हि आपल्याला. सुरुवात कुणी करायची बोलायला? एकतर मिनू माझ्यासोबत अशी माझ्याबाजूला एकटी बसलीय ह्या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नव्हता. मी तिलाच न्याहाळत होतो.कुणी इतकं भारी कसं दिसू शकतं यार??? वारा मस्त तिचे केस उडवत होता.तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसणं यायचं. "एक वारा गुणगुणत आला, स्पर्शुनी तुझला बेभान झाला." मी हि ऐकलं होतं कि, दारूत खूप नशा असते.पण खरं सांगतो,सौंदर्यात त्याहून जास्त नशा असते...विशेषत: जेव्हा ते सौंदर्य मुलीचं असतं.हि नशा डोक्यात अशी काही चढते कि उतरता उतरत नाही.उगाच नाही मुलं एखादीच्या मागे अशी वेडी होत. "बोल ना" ती बोलली. "मी काय सांगू?तूच बोलावलंस ना मला इथे? मग तूच बोल ना" "मी तर विद्याला बोलावलं होतं"....मी तिच्याकडेच पाहत होतो आणि "मला तू आवडतेस.तुला?" मला नाही राहवलं आणि मी क्षणात बोलून गेलो.छाती धडधडू लागली.आता काय होतंय नि काय नाही? एक क्षण...तिच्या चेहऱ्यावर जे भाव होते मी शब्दात कसे सांगू? त्यावर होकार होता, लाज होती, माझी स्वप्नं होती. काहीच नाही बोलली ती. पण मला हलकं वाटत होतं.विचित्र हि वाटत होतं.कसं वागू आता कळत नव्हतं. तिच्या त्या अस्पष्ट होकाराने मनात कारंजं उडत होती.क्षणात तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं.पण हिंमत नाही झाली.बराच वेळ शांततेत गेला. संध्याकाळ होत आली होती.इतक्यात माझ्या हातावर कुणी तरी हात ठेवला.नाजूक होता तो स्पर्श.मिनुचा होता का तो स्पर्श? हो. मिनुचाच होता. अंगातून एक शिरशिरी गेली. काय होतं त्या स्पर्शात? नाही सांगता येत.पण खुपसा विश्वास होता त्या स्पर्शात. जिव्हाळा, प्रेम, काळजी यांना मांडण्यासाठी स्पर्शाहून मोठं साधनच नाही. त्याच क्षणी कुठून हिंमत आली माहित नाही, पण मी तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या ओठांचं एक चुंबन घेतलं मी.तिने डोळे मिटून घेतले होते.एक समाधान होतं त्या डोळ्यांत.मला वाटले कि, या क्षणापुरता का होईना पण, मीच या पृथ्वीवरचा सर्वात सुखी माणूस आहे. ओठ वेगळे झाले. मी सुन्न झालो होतो.केले ते चूक कि बरोबर? तिला काय वाटले असेल माझ्याबद्दल? इतका नीच आहे का मी? मी केलं ते प्रेमापोटी केलं कि त्यात भूक होती? सुख आणि प्रश्न एकाच वेळी एकाच जागेवर हजर असले कि, सुख त्या प्रश्नांखाली दडपलं जातं. खुपसा वेळ असाच गेला.सुन्न... मग मी म्हणालो,"मिनू.....सॉरी" "श्री, एक सांगायचं होतं" "काय?" "मी यापुढे तुला कधीच भेटणार नाही.हि आपली शेवटची भेट" "पण मिनू...चुकलो मी.माफ कर. असं नव्हतं करायला पाहिजे मी." "नाही रे श्री.तू नाही चुकलायस. काहीकाही माणसं आपल्याला बघूनच आवडायला लागतात. पण का? याचे उत्तर नसतंच आपल्याकडे.मला तू खूप आवडतोस.पण....." 'पण'...हजारो श्वास अडकवून ठेवणारा हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा डोकावतोच. या 'पण' च्या मागे निर्णय लपलेला असतो..ज्यात बहुतेकदा तडजोडच जिंकलेली असते. आज हा 'पण' माझ्या आयुष्यात डोकावून पहात होता. पुढे ती बोलू लागली. "मला तू खूप आवडतोस.पण मला माझे बाबा हि खूप आवडतात.त्यांना फसवायला नाही जमणार मला. माझं तुझ्यावर आहे, ते प्रेम आहे का?हे मला माहित नाही पण काहीतरी आहे तुझ्यात.मला खेचतं तुझ्याकडे ते. पण या जगाशी लढायची हिंमत नाहीयेय माझ्यात.कारण या जगात माझे बाबा हि आहेत.माझ्या बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे.त्यांना हे सगळे कळले तर त्रास होईल त्यांना आणि मला ते अजिबात नकोय." "मिनू...." "श्री नको समजावूस मला काही.खूप विचार आधीच केलाय मी.प्लीज"...काय तरी झालं...पण डोळ्यांत थोडंसं पाणी आलं....तिच्याही आणि माझ्याही. मी समुद्राकडे पहात बसलो....मन जास्त खोल असतं कि समुद्र जास्त खोल असतो. मनच समुद्राहून जास्त खोल असतं.समुद्राचा तळ कधी ना कधी लागतोच.पण मन???? मनाचा तळ कधीकधी सापडतच नाही. "निघूया का?"ती बोलली. आवडत्या माणसासोबतची वेळ अशी पटकन कशी निघून जाते यार? थांबायचं होतं मला. नव्हतं तिथून जायचं आणि तिला हि जावू द्यायचं नव्हतं.पण....."हो" म्हणालो. परतीच्या वाटेत हि काहीच नाही बोललो आम्ही. रात्री बिछान्यावर पडून विचार करत बसलो. विचित्र संध्याकाळ होती आजची.म्हटले तर काहीच नाही घडले आज आणि म्हटले तर खूप काही घडले आज. मिनू..एका कोड्यासारखी.मला आठवत होते कि शेवटच्या क्षणी मी म्हणालेलो,"जातो मी.तू इथून त्या वेगळ्या रस्त्याने जा.म्हणजे कुणालाही संशय येणार नाही." "श्री, जातो नाही म्हणायचं कधी.येतो म्हणायचं." मी निघालो. मिनू... एकाच वाक्यात माणूस कधीकधी मनात उतरतो तर कधीकधी एकाच वाक्यात मनातून उतरतो. इतकी काळजी नको घेऊस. जगणं कठीण होऊन जाईल माझं तुझ्याशिवाय. आता या क्षणी मला ती माझ्याजवळ हवी होती.कायमची माझी म्हणून.माझी हक्काची म्हणून. मी मिनुसोबत असे का केले? तिला का जाऊ दिले? बऱ्याचदा माणूस स्वत:च स्वत:ला अनाकलनीय असतो. एखादी गोष्ट आपण का केली किंवा का घडली याची उत्तरं कधीकधी मरेपर्यंत मिळत नाहीत. काही प्रश्न अनुत्तर जन्माला येउन अनुत्तरच मरतात...आणि मारतात. त्यानंतर बरेच दिवस गेले.मिनू कधी भेटलीच नाही.विद्यालाही काही माहित नाही. मी थोडे दिवस बिथरलो.मग सावरलो. पुन्हा घेऊन फिरून लागलो....तेच...माझं दिल... हसण्यात लपवलेलं...माझं दिल... हसऱ्या चेह्र्याखाली हसरी वादळं घेऊन.. पण..... तो दिवस काय म्हणून लक्षात ठेवू मी? त्या दिवशी आम्ही भेटलो कि दूर झालो? एक मात्र पटतं... पहिला स्पर्श आणि पहिलं चुंबन हे विसरण्यासाठी नसतंच... ते नेहमी असंच राहतं... ताजं... मिनू....आजही आठवतात मला.... ना विसरलेले...पण थोडे सरलेले...थोडे मुद्दाम घट्ट धरलेले... ना फक्त तुझे...ना फक्त माझे...हे क्षण आपुले.

No comments:

Post a Comment