शब्दांचेच काळे ढग जमावे
सरी होऊन शब्दच बरसावे
तू वाचावे तुलाच मी लिहिलेले
मी समाधानाने चिंब भिजावे
आठवणीनी मनात बागडावे
स्पर्शाने तुझ्या कळ्यांनी फुलावे
ओल्या त्या पानातून वहीच्या
शब्दांनीच गंध होऊन दरवळावे
शब्द सारे फुलपाखरू होऊन उडावे
रंगास इंद्रधनू अपुले गुपित कळावे
ओळींवर आसवांची वीज पडावी
शब्दांनीच मग निशब्द होऊन रडावे
माझे शब्द सारे मग तुझेच व्हावे
मी शब्दा शब्दात कविता लिहावे
मी भावना कोरून ठेवाव्या पानात
तू त्यावर मुक्या शब्दांचे अभिप्राय द्यावे
No comments:
Post a Comment