हर फिक्र को धुएं में उडाता चला गया ...' असे म्हणत आपल्या सदाबहार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने हिंदी चित्रपट सृष्टीत पिढ्यानपिढ्या ' स्टार ' पण मनमुराद जगलेले असामान्य अभिनेत देव आनंद यांचे रविवारी लंडन येथे निधन झाले . हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या देव आनंद यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३ . ३० वाजता अखेरचा श्वास घेतला .
स्वत : ची वेगळी स्टाईल , वेगळ्या धाटणीची संवादफेक आणि तरल , मेलोडियस गाणी पडद्यावर जीवंत करण्याच्या अदाकारीने अनेकांच्या आयुष्यात आनंदाची पखरण करणाऱ्या ८८ वर्षांच्या देवसाब यांच्या निधनाचे वृत्त कळले आणि भारतवर्षातील त्यांच्या अमाप चाहत्यांसाठी रविवारची सकाळ सुन्न करणारी ठरली . बॉलिवूड असो की राजकारणी , समाजातल्या प्रत्येक स्तरातून देव आनंद यांच्यासाठी शोक उमटला . त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना कार्तिक , मुलगा आणि मुलगी , नातवंडे असा परिवार आहे .
लंडनमध्येच बुधवारी अंत्यसंस्कार
सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला असून देव आनंद यांची मुलगी व नात लंडनला पोहोचल्यावर बुधवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे . प्रकृतीने साथ दिल्यास देव आनंद यांच्या पत्नी कल्पना कार्तिकही लंडनला रवाना होणार आहेत .
देव आनंद यांच्या मृत्यूसमयी त्यांचे चिरंजीव सुनील देव त्यांच्यापाशी होते . वैद्यकीय उपचारासाठी त्यांना लंडन येथे काही दिवसांपूर्वी आणले होते . लंडनमधील हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते . स्थानिक वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास देव आनंद यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने सुनील देव यांनी , त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले . मात्र , तेथे आणण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
देव आनंद यांचे पार्थिवर मुंबईत आणण्याबाबतही विचार झाला होता . अखेर लंडनमध्येच अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले . कुटुंबीय लंडनमध्ये दाखल झाल्यावर मंगळवार किंवा बुधवारी अंत्यसंस्कार केले जातील , अशी ती माहिती त्यांचे व्यवस्थापक मोहन चुरीवाला यांनी दिली .
प्रार्थना सभा मुंबईत
अंत्यसंस्कार झाल्यावर देव आनंद यांचे कुटुंबीय मुंबईत परतणार असून त्यानंतर त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे .
..........
आयुष्यातील सर्व इच्छांची पूर्तता म्हणजे निवृत्तीचा क्षण ! माझे शरीर भलेही दुबळे झाले असेल , पण माझे मन अतिशय सशक्त आहे म्हणूनच मी पुढेच जात राहणार . मी केवळ जगत नाही , मी त्या जगण्याच्याही एक पाऊल पुढे आहे !
- देव आनंद
( २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका मुलाखतीत )
........
फिल्मफेअर कारर्कीर्द
१९५८ : कालापानी , १९६६ : गाईड , १९९१ : जीवनगौरव पुरस्कार . याशिवाय , मुनीमजी ( १९५५ ), लव्ह मॅरेज ( १९५९ ), कालाबाजार ( १९६० ) या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नायकाचे नामांकन मिळाले होते .
....
वेळ माझ्या हातून निसटतो आहे !
मी सतत धावतो आहे . कारण वेळ माझ्या हातातून निसटतो आहे . मला कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत , पण वेळ कुठे आहे ? देव आनंद म्हणून मला पुनर्जन्म मिळाला , तर आणखी २५ वर्षांनी लोकांना आणखी एक तरुण अभिनेता मिळेल .
- देव आनंद ( ८७व्या वाढदिवशी )
....
ती त्रयी !
राज कपूर , दिलीप कुमार आणि देव आनंद ! या तिघांनी हिंदी सिनेमाला ग्लॅमर दिले आणि कृत्रिम नायकाच्या इमेजमधून ' हिरो ' चा आविष्कार घडवला . विशेष म्हणजे , वयपरत्वे राज कपूर आणि दिलीप कुमार यांनी सिनेमातून नायकाची कामे थांबवली . परंतु , देव आनंद मात्र कायम नायकच राहिले . १९८३पर्यंत त्यांनी जॉनी मेरा नाम , देस परदेस , हरे रामा हरे कृष्णा सारख्या सिनेमातून नवतरुणींचा नायक साकारला .
...
आय एम देव आनंद !
प्रसिद्ध अभिनेते ग्रेगरी पेक यांच्यासोबत नेहमीच देव आनंद यांची तुलना केली जात असे . स्वत : देवआनंद लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अशी तुलना फारशी पसंत नव्हती . एक काळ असा असतो जेव्हा आपल्यावर काही व्यक्तिमत्त्वांची मोहिनी असते . परंतु , जसे जसे मोठे होत जातो तसतसे आपले स्वत : चे व्यक्तित्त्व आपल्याला गवसत जाते . इंंडियाज ग्रेगरी पेक अशी माझी ओळख व्हावी , असे मला वाटत नाही . आय अॅम देव आनंद !
....
पुण्यातल्या आठवणीत रमले तेव्हा ...
मा . दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निधी उभारणीसाठी पुण्यात एस . पी . कॉलेजच्या मैदानावर लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा मोठा कार्यक्रम झाला . त्यास देव आनंद प्रमुख पाहुणे होते . कार्यक्रमाच्या मध्यतरांची वेळ आली तरी देव आनंद आले नव्हते . अखेर ते रंगमंचावर आले आणि उशिराचे कारण सांगताना म्हणाले , ' बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . पुण्यातल्या रस्त्यांमध्ये आठवणी शोधत फिरत होता , म्हणून कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला '.
.....
आणखी दोन सिनेमांची तयारी !
देव आनंद यांचा शेवटचा सिनेमा ' चार्जशीट ' पडद्यावर आला आणि लागलीच पडद्याआड गेला . सेन्सॉर , मि . प्राइममिनिस्टर या सिनेमांचीही अवस्था अशीच होती . परंतु देवसाब त्यामुळे नाऊमेद झाले नव्हते . ' हरे रामा हरे कृष्णा ' च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली होती . शिवाय त्यांना ' गाईड ' ही पुन्हा प्रदर्शित करायचा होता
No comments:
Post a Comment