Tuesday, November 1, 2011

रात्री कंदिलाच्या प्रकाशात जरा वेळ शांतपणे बसून होतो....

रात्री कंदिलाच्या प्रकाशात जरा वेळ शांतपणे बसून होतो....
लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या लक्षात असलेल्या दिवाळी आठवत होतो...
लहानपणी आईचे बोट धरून मिठाईच्या दुकानात गेलो कि मला काजू कतली हवी असायचीच....
फटाक्यांसाठी माझा हट्ट, त्यातच लहान मुलांच्या दिवाळी अंकांचे माझे वेड....
.... हळूहळू मोठा होत गेलो, कितीतरी पणत्या प्रकाशित केल्या, काही लागल्याच नाहीत....
कधी दिवाळीच्या चैनीची मजा अनुभवली तर कधीतरी नुसत्याच फराळाला आपलेसे म्हणालो....
आईचे धरलेले बोट मी कधीच सोडले होते, मात्र आई अजूनही मला लहानच समजत होती.. किंबहुना आता ती लहान आणि मी मोठा होत होतो....
अनेक नानाविध चांगल्या-वाईट गोष्टींतून स्वतःला घडवत गेलो, घडतोय, घडत जाईन.... मनामध्ये जर पणती पेटती ठेवली तर कृष्णविवर सुद्धा विरून जाईल...
रांगोळीमध्ये रंग भरताना मन एकाग्र होते, तसे आयुष्यात पुढे जाताना व्हावयाचे....
..... आतून हाक आली, जेवायला ये... आई वाट पाहत होती, पुन्हा एकवार ओसरीमध्ये प्रकाश देणारया कंदिलाकडे पाहिले, जणू काही तो... मी असाच प्रत्येक दिवाळीमध्ये तुझ्या अंगणात प्रकाशाची ज्योत तेवत ठेवीन असे म्हणत होता... हळूच आईकडे पाहिले, त्या वत्सलेच्या मनात असलेली ममता जाणवली, डोळ्यांतून चटकन पाणी आले.... ते तसेच पुसले, औक्षण घेऊन पहिला घास हातात धरला... आई कंदिलाकडे पाहत होती, कदाचित आता त्या प्रकाशात तिने केलेल्या प्रवासाला ती साद घालत होती...

No comments:

Post a Comment