Tuesday, March 15, 2011

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

दोन शब्द आईसाठी

दोन शब्द आईसाठी ......


------------
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

** पिवळा गुलाब **

निरभ्र सकाळी
त्यानं मला गुलाब दिला..

पाकळी न पाकळी
जपत मी माझ्या वाटेनं निघाले..

हळुहळु आभाळ रुक्ष करडे झाले
अंधारलेल्या आभाळाखाली चालता चालता
अडखळले,
पडले
पण,गुलाबाला जपलं ,
दडलेल्या किड्याला काढून फेकलं..

काळं,जांभळं..
का कोण जाणे पण ,
कोसळतं आभाळ आता आपलं वाटेना..

आईई गं....

काटा बोटात रुतला
डोळ्यातला थेंब पाकळीवर निसटला..

बरसणा-या पावसासंगे
गुलाब खाली पडला , वाहून गेला..

(आई : चालायचंच,गुलाबाला ’ काटे ’ असणारंच ना वेडे)

मी, ओली पाकळी वहीत ठेवत..
पण ,
तो ' पिवळा गुलाब ' होता गं....

निरभ्र सकाळी
त्यानं मला गुलाब दिला..
( कवितेच्या नायिकेने, नायकाची मैत्री स्वीकारली तेव्हा परिस्थिती,नियती सारं काही सामान्य
होतं.(सामान्य परिस्थितीत आपले सगळेच दोस्त हसत,खेळत आपल्याला साथ देतात.)मैत्रीची परीक्षा
पाहणारी,नायिकेच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याची परिस्थिती आली नव्हती)

पाकळी न पाकळी
जपत मी माझ्या वाटेनं निघाले..
(स्वत:च आयुष्य जगता जगता,तिने त्या मैत्रीतल्या प्रत्येक चांगल्यावाईट रुपाला(पाकळी न
पाकळी)जपले)

हळुहळु आभाळ रुक्ष करडे झाले
अंधारलेल्या आभाळाखाली चालता चालता
अडखळले,
पडले
पण,गुलाबाला जपलं ,
(अन अखेर ख-या मैत्रीची परीक्षा घेणारी परिस्थिती आली.तिला एका संकटांला सामोरे जावे
लागले(तुमच्या आयुष्यात तुम्हालाही असा अनुभव कधीना कधी आला असेलच की अशा प्रसंगी आपल्या
दोस्तांनी आपली साथ द्यावी असे आपण इच्छितो.)अन,स्वत: संकटात असूनही,तिने मैत्री मात्र
जपली,तिच्यावरल्या संकटाचे सावट त्यांच्या मैत्रीवर पडू दिले नाही)

दडलेल्या किड्याला काढून फेकलं..
(गुलाबात दडलेला किडा म्हणजे मित्राचे अवगुण.ते माहित असूनही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष
केले,पण मैत्री जपली)

काळं,जांभळं..
का कोण जाणे पण ,
कोसळतं आभाळ आता आपलं वाटेना..
(अखेर नियतीच विरोधात गेली,तिची परिस्थिती वाईट झाली)

आईई गं....

काटा बोटात रुतला
(हसता,गातांना साथ देणा-या मित्राने नायिकेच्या संकटात मात्र तिला एकटे सोडले)
डोळ्यातला थेंब पाकळीवर निसटला..
(असे नव्हते की त्याला तिचे दु:ख,तिच्यावरचे संकट माहीत नव्हते)

बरसणा-या पावसासंगे
गुलाब खाली पडला , वाहून गेला..
(अन अखेर,सुखातच फक्त साथ देणारा अन दु:खात पाठ फिरवणा-या नायकाच्या मैत्रीला नियतीनेच
संपवले.तिच्या सुदैवाने,त्याच्याशी मैत्री तुटली,आपण म्हणतो ना,जे होतं ते चांगल्यासाठीच)

(आई : चालायचंच,गुलाबाला ’ काटे ’ असणारंच ना वेडे)
(जिव्हारी लागलेला घाव आपण आपल्या जवळच्या व्यक्तीलाच सांगणार ना,आई म्हणते
की,प्रत्येक नात्यांत थोडे फार वाईट अनुभवरुपी काटे असतातच)

मी, ओली पाकळी वहीत ठेवत..
(मैत्री जरी तुटली तरी त्याच्या मैत्रीची कदर मात्र तिला(च) आहे.परिस्थितीच्या पावसात हातातून
निसटलेल्या गुलाबाची एक पाकळी तिच्याकडे उरते.अन तीच मैत्रीची आठवण तिने जपलीय)

पण ,
तो ' पिवळा गुलाब ' होता गं....
(तिलाही याची जाणीव आहे की,ह्रदयावर घाव नेहमी जवळच्यांकडूनच होतात.पण,ती भाबडी
नायिका,प्रदीर्घ काळापासून तिला स्वत:चा मित्र म्हणवणारा नायक अशा त-हेने तिची साथ सोडू
शकतो,त्याचा असहकार रुपी काटा तिला जखमी करु शकतो अशी कल्पनाही करु शकत नव्हती.अन शेवटी
कारुण्यपूर्ण होत ती उद्गारते,’तो ' पिवळा गुलाब ' होता गं....’,(त्यालाही काटे असावेत ?)

शेवटची भेट....!!!

शेवटची भेट....!!!
रस्ता ओलांडताना अचानक
ओळखीचा चेहरा दिसला
अन पहिल्या प्रेमाची
आठवण देऊन गेला!१!
वाटलं द्यावी हाक
पण स्वताला आवरलं
कारण तुझ्या हाताला
लहानशा मुलानं धरलेलं!२!
आठवली शेवटची भेट
जेव्हा आपण भेटलेलो,
अन कॉलेजमध्ये झालेल्या प्रेमाची
शेवटी सांगता करायला आलेलो!३!
सतत बडबडणारी तू
त्या दिवशी शांत होती
डोळ्यात मात्र तुझ्या
खोल आसवं दाटलेली होती!४!
मी असाही अबोल,
माझीतर वाचाच गेली होती
आता वेगळ व्हायचं म्हणून
पायाखालची जमीनच सरकली होती!५!
मी दिलेला हिरवा ड्रेस
तू परिधान केला होता,
मी मात्र, तू दिलेला शर्ट
कपाटात जपून ठेवला होता!६!
शेवटच तुला डोळे
मनात साठवत होते,
तुझे डोळे मात्र मला
भिडण्यास काचरत होते!७!
न राहवून शेवटी हाथात
माझ्या लग्न-पत्रिका दिली
अन माझ आभाळच फाटल्याची
तेव्हा मला जाणीव झाली!८!
मी निघते,
म्हणून तू पाठमोरी झाली
अन तुझ्या पाठीवर काठीचे व्रण
असल्याची मला धूसर जाणीव झाली!९

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् ‍ या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय

दादर म्हणजे दादर असतं

दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर असतं

श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला
जे सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर असतं!

वसंत देसाई, वसंत प्रभू
सी रामचंद्र नि सुधीर फडके
दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर
चक्क नौशादसाहेब झोपत होते!
मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची
‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
दादर म्हणजे दादर असतं...

छबिलदासचा फर्मास बटाटावडा
नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर
नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,
खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं
दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
दादर म्हणजे दादर असतं...

शिवाजी पार्कच्या मैदानाला
एक किलोमीटरचा कटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा
मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
काला-खटटा च्या गाडीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं...
नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर असतं

हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत
साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!
पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ
भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का
गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
दादर म्हणजे दादर असतं...

पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
दादर म्हणजे दादर असतं.

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी


पण नाही माझ्या नशिबी ही प्रेयसी येईल का नाही