Monday, May 14, 2012

बाबू गेनूंच्या उरल्या फक्त आठवणी

एक क्रांतिकारी नेता इंग्रजांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचे स्वातंत्र्यदिनी देशभर स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्यांच्या या चळवळीत अनेकांना प्रणाची आहुती दिली. मुंबईत परदेशी मालाला विरोध करणारे शहीद बाबू गेनू हे असेच एक नाव आहे. बाबू गेनूंचे नाव सध्याच्या तरुण पिढीच्या लक्षात नसेलही. मात्र आजच्या दिवशी त्यांची आठवण महत्वाची आहे. कोण होते बाबू गेनू बाबू गेनूचे पूर्ण नाव बाबूराव गेनू असे होते. सध्या चकाचक मॉलमध्ये रूपांतरीत झालेल्या एकेकाळच्या नावाजलेल्या फिनिक्स मिलमध्ये बाबू कामाला होते. बाबूंचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील महाळुंगे हे होते. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती. १९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. मुंबईत परदेशी मालाची विक्री करणा-यांची दुकाने बंद करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी मालाला विरोध करत त्यांनी मुंबईच्या काळबादेवी बाजारात कपड्यांनी भरलेले ट्रक अडवले होते. मात्र मालाचा एक ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात ते चिरडले गेले. या घटनेत बाबू गेनू गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबू गेनू रस्त्याची सद्यस्थिती ज्या रस्त्यावर बाबू गेनूंना परदेशी मालाने भरलेल्या ट्रकने चिरडले होते त्याला नंतर ' बाबू गेनू रोड ' असे नाव देण्यात आले. या रस्त्याची आजची अवस्था काय आहे ? व्यापारी भाग असलेल्या, साधारण २० फूट रुंद या रस्त्याच्या दुतर्फा आज विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. मुख्यत : हस्तकलेच्या वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि कपड्यांची दुकाने आपल्याला इथे दिसतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी अस्वच्छता नजरेस येते आणि दिवसभर वाहनांचा कल्लोळ इथे ऐकायला येतो. ' स्वदेशी चळवळीदरम्यान याच रस्त्यावर बाबू गेनूने आपले प्राण अर्पण केले होते, अशी आम्हाला माहिती मिळते. याव्यतिरिक्त आम्हाला बाबू गेनूविषयी फार काही माहिती नाही ' अशी माहिती सध्याच्या बाबू गेनू रोडवरील एका दुकानदाराने दिली. विशेष म्हणजे बाबू गेनूच्या घटनेच्या वेळी या दुकानदाराचे आजोबा येथे व्यवसाय करत होते. बाबू गेनूंविषयी अधिक विचारले असता हा दुकानदार म्हणाला, ' बाबू गेनूंविषयी इथं कधीही फार काही चर्चा केली जात नाही. त्यामुळं त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळत नाही. ' या रस्त्याच्या कडेला एका छत्रीविक्रेत्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला , ' वर्षातून एकदा बाबू गेनूंच्या जयंतीदिनी परिसरातले काही लोक इथं एकत्र येतात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही जण भाषणे करतात. आणि निघून जातात. त्याव्यतिरिक्त वर्षभर इथं फारसं काही होत नाही. ' या रस्त्यावर फेरफटका मारला असता बाबू गेनूंची आठवण म्हणून इथं कुठेही त्यांचा पुतळा किंवा प्रतिमा उभारलेली दिसत नाही. १२ डिसेंबर १९३० रोजी मात्र या परिसरातली परिस्थिती एकदम वेगळी होती. बाबू गेनू शहीद झाले त्या ठिकाणी शहरातल्या शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या. पुढचे दोन दिवस या रस्त्यावर बाबू गेनूंच्या रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. बाबू गेनूंना श्रद्धांजली वाहत शहरातल्या नागरिकांनी या जागेवर पुष्पं वाहिली तर काहींनी अगरबत्ती लावली होती. परदेशी मालाचा निषेध करत नागरिकांनी शहराच्या विविध भागात कपड्यांची होळी केली होती. या घटनेनंतर पुढचे काही दिवस मुंबईतील ' टाइम्स ऑफ इंडिया ' , ' नवाकाळ ' , ' बॉम्बे क्रॉनिकल ' , ' मुंबई समाचार ' या त्यावेळच्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी वृत्तांकन केले होते. बाबू गेनूंचा मृत्यू कसा झाला परदेशी कपड्यांचे व्यापारी या परिसरात ट्रकमध्ये माल भरत होते. त्यावेळी स्वदेशी आंदोलन जोरात सुरू होतं. त्यामुळं आंदोलनकर्त्यांचा त्रास होऊ नये म्हणून या इंग्रज व्यापा-याने पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. दरम्यान परदेशी कपड्यांचे गठ्ठे भरलेला ट्रक या रस्त्यावरून जात असताना काही स्वदेशीच्या आंदोलनकर्ते ट्रकसमोर आडवे झाले. त्यात बाबू गेनू हेही होते. विठोबा धोंडू नावाचा एक भारतीय ट्रक चालवत होता. आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्यास त्याने नकार दिला. ट्रकमध्ये बसलेल्या एका ब्रिटीश सार्जंट त्यामुळं रागावला. त्याने ट्रकचा ताबा घेतला आणि थेट आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून नेला. त्यातच बाबू गेनी शहीद झाले. या घटनेनंतर ब्रिटीश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत खुलाशात म्हटले आहे की ट्रक चालक जखमी झाल्यामुळं तो बेशुद्ध झाला. त्यानंतर ब्रिटीश सार्जंटने ट्रकचा ताबा घेतला. तोपर्यंत ट्रकवरचा त्याचा ताबा सुटला होता आणि तो आंदोलनकर्त्यांच्या अंगावर आदळला. आंदोलनकर्त्यांना जखमी करण्याचा ब्रिटीश सार्जंटचा कोणताही हेतू नव्हता, असं या खुलाशात म्हटलं आहे. ट्रकखाली सापडलेल्या इतर आंदोलनकर्त्यांना हळूहळू काढण्यात आले. मात्र बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यानं ते गंभीर जखमी झाले आणि त्याचत मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईत लोकांचा जनक्षोभ उसळला होता. बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोक जमा झाले होते. शहराच्या मध्यभागातून अंत्ययात्रा निघाली. बाबू गेनूंवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार व्हावे अशी लोकांची इच्छा होती. या ठिकाणी पूर्वी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. टिळकांसारखं सन्मान बाबू गेनूंना मिळावा अशी लोकांची इच्छा होती. मात्र इंग्रजांनी ही परवानगी नाकारली. तेव्हा लोकांचा राग अनावर झाला. परिणामी ब्रिटीश पोलिस आणि मुंबईतल्या नागरिकांमध्ये चांगल्याच झटापटी झाल्या. नंतर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी लोकांना समजावले. आणि शेवटी इंग्रजांनी ठरवून दिलेल्या जागेवर बाबू गेनूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबू गेनूच्या कवटीला मार लागल्यामुळं त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला असल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं. या घटनेच्या वेळी सर्व आंदोलक जखमी झाल्यानं कोणताही साक्षीदार नोंदवण्यात आलेला नव्हता. बाबू गेनू हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगत कॉंग्रेस कार्यालयात त्याचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. क्वीन्स् रोडवर झालेल्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते जमनालाल बजाज, लिलावती मुंशी, पेरीन कॅप्टन आणि जमनादास मेहता या प्रभूती उपस्थित होत्या. बाबू गेनू परळमध्ये राहत होते. त्यामुळं परळच्या कामगार मैदानात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातल्या एका रस्त्याला बाबू गेनूचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावाने एक संस्थाही आहे. स्वदेशीच्या चळवळीत आपले प्राण झोकूण देणा-या या विराविषयी भारतीय स्वातंत्र्याइतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. ज्या मुंबई शहरात बाबू गेनूने देशासाठी आपले प्राण त्यागले तिथं एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र ६२ वा स्वात्रदिवस साजरा करत असताना बाबू गेनूसारख्या शहीदाला आपण विसरत चाललो असल्याची भावना मनात घर करून राहते. आमोल घायाळ ,मुंबई ( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )

3 comments:

  1. Replies
    1. आज बहुसंख्य भारतीय परदेशातल्या विशेषतः चीनमधून आयात केलेल्या वस्तु वापरण्यात धन्यता मानतात त्यामध्ये स्वतःला देशभक्त म्हणविणारे कित्येक आहेत.आतातर माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात परदेशी वस्तु वापरणे कालबाह्य झाले असेल कदाचित,पण
      आदेश काढून सरकारने कमीतकमी या दिवशी तरी लोकांनी आयात केलेल्या वस्तु वापरू नयेत असे आवाहन करावे.
      जगन्नाथ आल्हाट पिंपरी पुणे

      Delete
  2. Babu Genu yanchya aai ani Wadilanche nav kai hote?

    ReplyDelete