Tuesday, March 20, 2012

|| जय जय रघुवीर समर्थ |

||सार्थ मनाचे श्लोक || ||२२||
मना सज्जना हीत माझे करावे |रघूनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||२२||

अर्थ : - मागला खोटेपणा टाकून देताना नवी काही तरी शुध्द वस्तु त्याला लावावी लागते.सुवर्ण अग्नीने शुध्द करतात. पाणी तुरटीच्या स्पर्शाने शुध्द करतात. पण अशी कोणती वस्तु आहे की, ती मनाला लावली म्हणजे ते शुध्द होईल? मनाचे पाप चंचलतेत असते. त्याच्या शुध्दीसाठी बलवान, अचंचल, दृढनिश्चयी विचाराचे प्रतीक जोडावयास हवे. ते प्रतीक म्हणजे राम.
श्रीरामदासांनी या श्र्लोकातील पहिली ओळच सूक्ष्म सत्याला भिडविली आहे. मनाला त्याच्याही पलीकडल्या गाभ्यात जाऊन रामाचा स्पर्श पोहचविण्यास संागितले आहे. आपल्या मनाला आपणच बजावायचे, ‘आता आपले हित आपणच करून घ्यावयाचे आहे. ‘ मनाच्याही मुळाशी राघव नेऊन ठेवला म्हणजे बाकी फळापर्यंत राघवच पोहचणार.
श्र्लोकाच्या तिसर्या ओळीत श्रीरामबलाचा एक पुरावा दिला आहे. वायुपुत्र बलवंत हनुमान म्हणजे तेज आणि शक्तीचे प्रतीक. त्या हनुमानानेच रामाला स्वामी मानले आहे, शक्तिदाता मानलेले आहे. यावरून रामाची शक्ती केवढी थोर, केवढी मूलभूत आणि महान असेल! स्वर्ग असो, पृथ्वी असो, पाताळ असो, उंचापासून खोलापर्यंत कोठेही रामशक्तीचा आश्रय शुध्द करील. त्रासापासून सोडवील. हे चौथ्या ओळीचे कथन आहे. त्याची तर्करेषा पहिल्या तीन ओळींशी सुसूत्रच आहे

|| जय जय रघुवीर समर्थ |

No comments:

Post a Comment