निरभ्र सकाळी
त्यानं मला गुलाब दिला..
पाकळी न पाकळी
जपत मी माझ्या वाटेनं निघाले..
हळुहळु आभाळ रुक्ष करडे झाले
अंधारलेल्या आभाळाखाली चालता चालता
अडखळले,
पडले
पण,गुलाबाला जपलं ,
दडलेल्या किड्याला काढून फेकलं..
काळं,जांभळं..
का कोण जाणे पण ,
कोसळतं आभाळ आता आपलं वाटेना..
आईई गं....
काटा बोटात रुतला
डोळ्यातला थेंब पाकळीवर निसटला..
बरसणा-या पावसासंगे
गुलाब खाली पडला , वाहून गेला..
(आई : चालायचंच,गुलाबाला ’ काटे ’ असणारंच ना वेडे)
मी, ओली पाकळी वहीत ठेवत..
पण ,
तो ' पिवळा गुलाब ' होता गं....
निरभ्र सकाळी
त्यानं मला गुलाब दिला..
( कवितेच्या नायिकेने, नायकाची मैत्री स्वीकारली तेव्हा परिस्थिती,नियती सारं काही सामान्य
होतं.(सामान्य परिस्थितीत आपले सगळेच दोस्त हसत,खेळत आपल्याला साथ देतात.)मैत्रीची परीक्षा
पाहणारी,नायिकेच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याची परिस्थिती आली नव्हती)
पाकळी न पाकळी
जपत मी माझ्या वाटेनं निघाले..
(स्वत:च आयुष्य जगता जगता,तिने त्या मैत्रीतल्या प्रत्येक चांगल्यावाईट रुपाला(पाकळी न
पाकळी)जपले)
हळुहळु आभाळ रुक्ष करडे झाले
अंधारलेल्या आभाळाखाली चालता चालता
अडखळले,
पडले
पण,गुलाबाला जपलं ,
(अन अखेर ख-या मैत्रीची परीक्षा घेणारी परिस्थिती आली.तिला एका संकटांला सामोरे जावे
लागले(तुमच्या आयुष्यात तुम्हालाही असा अनुभव कधीना कधी आला असेलच की अशा प्रसंगी आपल्या
दोस्तांनी आपली साथ द्यावी असे आपण इच्छितो.)अन,स्वत: संकटात असूनही,तिने मैत्री मात्र
जपली,तिच्यावरल्या संकटाचे सावट त्यांच्या मैत्रीवर पडू दिले नाही)
दडलेल्या किड्याला काढून फेकलं..
(गुलाबात दडलेला किडा म्हणजे मित्राचे अवगुण.ते माहित असूनही तिने त्याच्याकडे दुर्लक्ष
केले,पण मैत्री जपली)
काळं,जांभळं..
का कोण जाणे पण ,
कोसळतं आभाळ आता आपलं वाटेना..
(अखेर नियतीच विरोधात गेली,तिची परिस्थिती वाईट झाली)
आईई गं....
काटा बोटात रुतला
(हसता,गातांना साथ देणा-या मित्राने नायिकेच्या संकटात मात्र तिला एकटे सोडले)
डोळ्यातला थेंब पाकळीवर निसटला..
(असे नव्हते की त्याला तिचे दु:ख,तिच्यावरचे संकट माहीत नव्हते)
बरसणा-या पावसासंगे
गुलाब खाली पडला , वाहून गेला..
(अन अखेर,सुखातच फक्त साथ देणारा अन दु:खात पाठ फिरवणा-या नायकाच्या मैत्रीला नियतीनेच
संपवले.तिच्या सुदैवाने,त्याच्याशी मैत्री तुटली,आपण म्हणतो ना,जे होतं ते चांगल्यासाठीच)
(आई : चालायचंच,गुलाबाला ’ काटे ’ असणारंच ना वेडे)
(जिव्हारी लागलेला घाव आपण आपल्या जवळच्या व्यक्तीलाच सांगणार ना,आई म्हणते
की,प्रत्येक नात्यांत थोडे फार वाईट अनुभवरुपी काटे असतातच)
मी, ओली पाकळी वहीत ठेवत..
(मैत्री जरी तुटली तरी त्याच्या मैत्रीची कदर मात्र तिला(च) आहे.परिस्थितीच्या पावसात हातातून
निसटलेल्या गुलाबाची एक पाकळी तिच्याकडे उरते.अन तीच मैत्रीची आठवण तिने जपलीय)
पण ,
तो ' पिवळा गुलाब ' होता गं....
(तिलाही याची जाणीव आहे की,ह्रदयावर घाव नेहमी जवळच्यांकडूनच होतात.पण,ती भाबडी
नायिका,प्रदीर्घ काळापासून तिला स्वत:चा मित्र म्हणवणारा नायक अशा त-हेने तिची साथ सोडू
शकतो,त्याचा असहकार रुपी काटा तिला जखमी करु शकतो अशी कल्पनाही करु शकत नव्हती.अन शेवटी
कारुण्यपूर्ण होत ती उद्गारते,’तो ' पिवळा गुलाब ' होता गं....’,(त्यालाही काटे असावेत ?)
No comments:
Post a Comment